विठ्ठल

वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत

विठ्ठल (विठोबा (IAST: Viṭhobā), ज्याला विठ्ठल (IAST: Viṭṭhala), आणि पांडुरंग (IAST: Pāṇḍuraṅga) म्हणूनही ओळखले जाते, हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळा रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलत: एकेश्वरवादी, गैर-विधीवादी भक्ती-चालित[१][२] महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर, पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी-संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते. वारकरी कवी-संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तीगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहासलेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते १३ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.[३]

विठ्ठल

पंढरपूरच्या विठोबा मंदिरातील मध्यवर्ती प्रतिमा.
मराठीविठोबा
निवासस्थानपंढरपूर
वाहनगरुड
शस्त्रचक्र आणि शंख
पत्नीरखुमाई, राही आणि सत्यभामा
या अवताराची मुख्य देवताविष्णू/कृष्णाचे रूप
तीर्थक्षेत्रेविठ्ठल मंदिर (पंढरपूर)


विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती

हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते.[४][३] विठोबा, विठुराया, पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्रकर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते. विठोबा, ज्याला वि(त) थल(अ) आणि पांडुरंगा म्हणूनही ओळखले जाते. त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार, कृष्णाचे रूप मानले जाते.[५]कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[४][६]

हिंदू देवता स्वरूप

विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[३]विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे.

वर्णन

गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात.

धार्मिक स्थान

त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील

पंढरपूर येथे आहे.[७] जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे 'चंद्रभागा' म्हणतात. विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे हिंदू आराध्यदैवत होय.[८]

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[९] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशीप्रबोधिनी एकादशी आहेत.

श्री पांडुरंग

पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.[१०]आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार जन्म द्वापार युगात बुधवार दि. १३ जून इ.स.पु. -३२२८ श्रावण वद्य अष्टमी, श्रीमुख नाम संवत्सर ला पहाटे झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.

पुराणातील श्लोकाप्रमाणे:-

वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||

अर्थ-

  • वि- विधाता- ब्रम्हदेव
  • ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
  • ल- लक्ष्मीकांत- विष्णू

याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.

श्रीविठ्ठल मुर्तीवर्णन

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.[११]

श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊन समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.

द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.

श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येऊन दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.

पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.

पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात || पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||

पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी

महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते.[१२]

दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते.[३] प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[१३]

धूपारती[१४]

दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
कालविला दहीभात आले मिरे लवणा,
साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
उद्धवचिद्‌घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’
हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.

शेजारती[१४]

नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचार

  • पहाटे ४ - मंदिर भाविकांसाठी खुले
  • पहाटे ४.१५ ते ६ - काकडआरती आणि नित्यपूजा
  • सकाळी ११ ते ११.१५ - महानैवेद्य
  • दुपारी ४.३० ते ५ - पोषाख नेसवणे
  • सायंकाळी ७ ते ७.३० - धुपारती
  • रात्री ११.४५ ते १२.४५ - शेजारती.[१३]
दशावतार origional photo

बाबा पाध्ये

विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[१५] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[१५]

संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे.'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[१५]

आळंदी-पंढरपूरची वारी

देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात[३]. आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची मुक्ताईनगरहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर तर संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[३] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१६]

विठोबाशी निगडित कथा

विठोबा हा देव भक्त भक्तांच्या भेटीला आलेला आहे व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. श्रीहरी विठ्ठल नामे अवतार घेऊन परमभक्तांना भेटून स्वरूप दाखविले होते आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.

पांडुरंग माहात्म्य

आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[१७]

मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५ चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे.

अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत.

साहित्यात व कलाक्षेत्रात

पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे.[१८][१९]

पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते. त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ]

याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनाचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.[ संदर्भ हवा ]

२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[२०]

विठ्ठलासंबंधित अन्य पुस्तके

  • एक विठ्ठल नाम (डाॅ. विद्यासागर पाटंगणकर)
  • दादाभाऊ गावडे यांनी ’शोधिता विठ्ठल’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
  • पी. विठ्ठल यांनी लिहिलेल्या 'शून्य एक मी' या संग्रहात 'विठ्ठल : एक संवाद' या नावाची एक कविता आहे.
  • शोध पांडुरंगाचा (डाॅ. अनिल सहस्रबुद्धे)

मराठी विठ्ठलगाणी आणि कविता

विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -

(अपूर्ण यादी)

विठ्ठल आरती

१) युगे अठ्ठावीस

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव ।। 2।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव ।।3।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
जय देव जय देव ||5||

२) येई हो विठ्ठले

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णूदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥


चित्रदालन


हे सुद्धा पहा

संदर्भ यादी

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी