हंस (तारकासमूह)

हंस हा उत्तर खगोलातील आकाशगंगेवरील एक तारकासमूह आहे. त्याचे Cygnus (सिग्नस) हे इंग्रजी नाव मुळात हंस या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. हंस तारकासमूहातील ताऱ्यांपासून फुलीसारखा आकार बनतो, ज्यामुळे हा तारकासमूह सहज ओळखता येतो. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता.

सिंह
तारकासमूह
सिंह मधील ताऱ्यांची नावे
लघुरुपCyg
प्रतीकहंस पक्षी किंवा उत्तरेतील फुली
विषुवांश२०.६२
क्रांती+४२.०३
चतुर्थांशएनक्यू४
क्षेत्रफळ८०४ चौ. अंश. (१६वा)
मुख्य तारे
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
८४
ग्रह असणारे तारे९७
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी ताराडेनेब (α Cyg) (१.२५m)
सर्वात जवळील तारा61 Cyg
(११.३६ ly, ३.४८ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षावऑक्टोबर सिग्निड्स
कॅपा सिग्निड्स
शेजारील
तारकासमूह
वृषपर्वा
कालेय
स्वरमंडळ
जंबुक
महाश्व
सरठ
+९०° आणि −४०° या अक्षांशामध्ये दिसतो.
सप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

वर्णन

मोठ्या आकाराच्या या तारकासमूहाच्या उत्तर आणि पूर्व सीमेला वृषपर्वा, उत्तर आणि पश्चिम सीमेला कालेय, पश्चिमेला स्वरमंडळ, दक्षिणेला जंबुक, आग्नेयेला महाश्व आणि पूर्वेला सरठ हे तारकासमूह आहेत. १९२२ साली आयएयू ने हंससाठी 'Cyg' हे लघुरूप स्वीकृत केले.[१] याचा अधिकृत आकार २८ भुजा असलेली बहुभुजाकृती आहे. विषुववृत्तीय निर्देशांक प्रणालीमध्ये याच्या सीमा विषुवांश १९ता ०७.३मि ते २२ता ०२.३मि, आणि क्रांती २७.७३° ते ६१.३६° यादरम्यान आहेत.[२] खगोलावरील ८०४ चौरस अंश क्षेत्रफळ (१.९%) व्यापणारा हा तारकासमूह आकाराच्या क्रमवारीमध्ये १६वा आहे.[३]

हंस उत्तर गोलार्धामध्ये २९ जूनच्या मध्यरात्री डोक्यावर दिसतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून शरद ऋतूच्या मध्यापर्यंत संध्याकाळी आकाशात दिसतो.[३]

वैशिष्ट्ये

नुसत्या डोळ्यांनी दिसणारे हंस तारकासमूहातील तारे आणि त्यामधील फुलीसारखा आकार.

तारे

व्ही१३३१ सीवायजी हा एलडीएन ९८१ या कृष्णमेघातील एक तारा आहे.[४]

हंसमध्ये अनेक प्रखर तारे अहेत. हंसक ज्याला इंग्रजीमध्ये अल्फा सिग्नी किंवा डेनेब म्हणतात हा हंसमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. हा एक पांढरा महाराक्षसी तारा आहे ज्याची दृश्यप्रत १.२१ आणि १.२९ यादरम्यान बदलते.[५] हा तारा पृथ्वीपासून ३२०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[६] अल्बिरिओ किंवा बीटा सिग्नी एक द्वैती तारा आहे. प्रमुख तारा नारंगी रंगाचा ३.१ दृश्यप्रतीचा आणि दुय्यम तारा निळ्या रंगाचा ५.१ दृश्यप्रतीचा आहे. ही प्रणाली ३८० प्रकाशवर्ष दूर आहे.[७] गॅमा सिग्नी हा पिवळसर महाराक्षसी तारा आहे. याची दृश्यप्रत २.२ असून त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १५०० प्रकाशवर्षे आहे.[८] डेल्टा सिग्नी हा पृथ्वीपासून १७१ प्रकाशवर्षे अंतरावरील आणखी एक द्वैती तारा आहे. यातील घटकांचा परिभ्रमणकाळ ८०० वर्षे आहे. मुख्य तारा निळ्या-पांढऱ्या छटेचा राक्षसी तारा आहे ज्याची दृश्यप्रत २.९ आहे आणि दुय्यम ताऱ्याची दृश्यप्रत ६.६ आहे.[९] एप्सिलॉन सिग्नी हा हंसमधील ३ पेक्षा कमी दृश्यप्रत असणाऱ्या ताऱ्यांमधील पाचव्या क्रमांकाचा तारा आहे. पृथ्वीपासून ७२ प्रकाशवर्षे अंतरावरील या नारंगी राक्षसी ताऱ्याची दृश्यप्रत २.५ आहे.[१०][११]

याव्यतिरिक्त हंसमध्ये म्यू सिग्नी, साय सिग्नी, ६१ सिग्नी यांसारखे अनेक अंधुक द्वैती तारे आहेत.

ईटा सिग्नी जवळ सिग्नस एक्स-१ हा क्ष-किरण स्रोत आहे. हा स्रोत द्वैती प्रणालीमधील एक कृष्णविवर असून ते द्रव्य ॲक्रिट[मराठी शब्द सुचवा] करत असल्याचे मानले जाते. हा कृष्णविवर मानला जाणारा पहिला क्ष-किरण स्रोत होता.

हंसमध्ये इतर अनेक दखलपात्र क्ष-किरण स्रोत आहेत. सिग्नस एक्स-३ हा एक सूक्ष्मक्वेसार आहे ज्यामध्ये एक वुल्फ-रायेट तारा एका अत्यंत संहत (कॉम्पॅक्ट) वस्तूभोवती[१२] ४.८ तास आवर्तिकाळ असणाऱ्या कक्षेमध्ये फिरत आहे.[१३] या प्रणालीमध्ये ठराविक काळाने अज्ञात प्रकारचे उद्रेक होतात[१४] आणि एका अश्या उद्रेकामध्ये म्यूऑन उत्सर्जित झालेले आढळून आले जे बहुतेक न्यूट्रिनोमुळे घडले असावे.[१५] या प्रणालीतून वैश्विक किरण आणि गॅमा किरण उत्सर्जित होतात, ज्यामुळे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश पडण्यास मदत झाली आहे.[१६] त्यामुळे जरी ती संहत वस्तू न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवर आहे असे मानण्यात येत असले[१७], तरी ती वस्तू एक क्वार्क तारा, एक विलक्षण प्रकारचा ताऱ्याचा अवशेष असण्याची शक्यता वर्तवली जाते[१८], कारण साधारण न्यूट्रॉन ताऱ्यामधून वैश्विक किरणांची निर्मिती होत नाही. सिग्नस एक्स-२ ही आणखी एक क्ष-किरण द्वैती प्रणाली आहे ज्याच्यामध्ये एक राक्षसी तारा न्यूट्रॉन ताऱ्याभोवती ९.८ दिवस परिभ्रमणकाळ असणाऱ्या कक्षेमध्ये फिरत आहे.[१९] व्ही४०४ सिग्नी हे हंसमधील आणखी एक कृष्णविवर आहे ज्यामध्ये एक तारा एका १२ सौर वस्तूमानाच्या कृष्णविवराभोवती फिरत आहे.[२०]

हंसमध्ये अनेक चलतारे आहेत. एसएस सिग्नी या ताऱ्यामध्ये दर ७-८ दिवसांनी उद्रेक होतात. त्याची दृश्यप्रत जास्तीत जास्त १२ ते कमीत कमी ८ या दरम्यान बदलते. काय सिग्नी हा एक लाल राक्षसी चल तारा आहे ज्याची दृश्यप्रत दर ४०८ दिवसांनी ३.३ ते १४.२ यादरम्यान बदलते.[२१] तो पृथ्वीपासून ३५० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याचा व्यास सूर्याच्या ३०० पट आहे. याशिवाय हंसमध्ये पी सिग्नी, डब्ल्यू सिग्नी, एनएमएल सिग्नी यासारखे इतर चलतारे आहेत.

केप्लर दुर्बिणीने सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रामध्ये हंसचा समावेश असल्याने यामधील जवळपास शंभर ताऱ्यांभोवती ग्रह सापडले आहेत.[२२] यामधील केप्लर-११ या प्रणालीमध्ये सूर्यासारख्या एका ताऱ्याभोवती सहा ग्रह सापडले आहेत. यातील सर्व ग्रह पृथ्वीपेक्षा जास्त वस्तूमानाचे आहेत आणि शेवटचा ग्रह सोडून इतर सर्व ग्रह त्यांच्या ताऱ्यापासून सूर्य ते बुध ग्रह या अंतरापेक्षाही कमी अंतरावर आहेत.[२३] केप्लर-२२ प्रणालीमध्ये सापडलेला ग्रह पहिला पृथ्वीसदृश ग्रह समजला जातो.[२४]

दूर अंतराळातील वस्तू

उत्तर अमेरिकन तेजोमेघ (एनजीसी ७०००) हा हंसमधील सर्वात प्रसिद्ध तेजोमेघ आहे.

हंस आकाशगंगेवर असल्याने यामध्ये अनेक खुले तारकागुच्छ, वेगवेगळ्या प्रकारचे तेजोमेघ आणि अतिनवताऱ्यांचे अवशेष आहेत.

एम३९ (एनजीसी ७०९२) हा पृथ्वीपासून ९५० प्रकाश-वर्षे अंतरावरील अंधाऱ्या रात्री नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारा खुला तारकागुच्छ आहे. हा अंदाजे ३० ताऱ्यांचा गुच्छ असून तो काहीसा त्रिकोणी आकाराचा दिसतो. यातील सर्वात तेजस्वी तारे ७व्या दृश्यप्रतीचे आहेत.[२५] एनजीसी ६९१० हा हंसमधील आणखी एक १६ ताऱ्यांचा खुला तारकागुच्छ आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रॉकिंग हॉर्स क्लस्टर असे म्हणतात. याची दृश्यप्रत ७.४ असून व्यास ५ कला (आर्कमिनिट) आहे. याव्यतिरिक्त हंसमध्ये डॉलित्झ ९, कोलिंडर ४२१, डॉलित्झ ११, बर्कली ९० हे खुले तारकागुच्छ आहेत.

एनजीसी ६८२६ हा पृथ्वीपासून ३२०० प्रकाश-वर्षे अंतरावरील ८.५ दृश्यप्रतीचा ग्रहीय तेजोमेघ आहे. याला लुकलुकणारा ग्रहीय तेजोमेघ असेही म्हटले जाते. याच्यातील केंद्रीय तार अतिशय तेजस्वी (१० दृश्यप्रत) असल्यामुळे याच्याकडे दुर्बिणीतून पाहिले असता तो लुकलुकल्याचा भास होतो.[२६][२५] दुर्बीण ताऱ्यावर केंद्रित केली असता तेजोमेघ निस्तेज झाल्याचा भास होतो. याच्यापासून एक अंशापेक्षा कमी अंतरावर १६ सिग्नी हा द्वैती तारा आहे.[२५]

उत्तर अमेरिकन तेजोमेघ (एनजीसी ७०००) हा हंसमधील सर्वात प्रसिद्ध तेजोमेघांपैकी एक आहे, कारण याला अंधाऱ्या रात्री नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते. हा आकाशगंगेमध्ये एका प्रखर ठिगळासारखा दिसतो. पृथ्वीपासून १५०० प्रकाश-वर्षे अंतरावरील एनजीसी ७०००ला ६ दृश्यप्रतीचा तारा प्रकाशमान करतो.[२५]

एप्सिलॉन सिग्नीच्या दक्षिणेला व्हेल तेजोमेघ (एनजीसी ६९६०, ६९६२,६९७९, ६९९२ आणि ६९९५) हा ५००० वर्ष जुना अतिनवताऱ्याचा अवशेष आहे ज्याचा आकार तीन अंश[२७], ५० प्रकाशवर्षे आहे.[२५] त्याच्या आकारामुळे त्याला हंस वर्तुळ (सिग्नस लूप) असेही म्हटले जाते.[२७]

सिग्नस एक्स हे हंसमधील तारे-निर्मितीचे सर्वात मोठे क्षेत्र आहे.

हंसमध्ये गॅमा सिग्नी तेजोमेघ (आयसी १३१८) हा ४ अंशांपेक्षा जास्त विस्ताराचा तेजोमेघ आहे. डीडब्ल्यूबी ८७, शार्पलेस २-११२ आणि शार्पलेस २-११५ हे इतर तेजोमेघ गॅमा सिग्नी भागात आहेत.

आणखी एक दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चंद्रकोर तेजोमेघ, जो गॅमा आणि ईटा सिग्नीच्या मध्ये आहे. त्याची निर्मिती एचडी १९२१६३ या वुल्फ-रायेट ताऱ्यापासून झाली.

अलीकडील काळामध्ये हौशी खगोल निरीक्षकांनी हंसमध्ये काही दखलपात्र नवीन शोध लावले आहेत. २००७ मध्ये डेव्ह जुरासेविच यांनी एका डिजिटल फोटोमध्ये चंद्रकोर तेजोमेघाजवळील "सोप बबल तेजोमेघाचा" (पीएन जी७५.५+१.७) शोध लावला. २०११ मध्ये मॅथिआस क्रॉनबर्गर या हौशी ऑस्ट्रिअन खगोल निरीक्षकाने क्रॉनबर्गर ६१ या ग्रहीय तेजोमेघाचा जुन्या सर्व्हेच्या फोटोंमधून शोध लावला. जेमिनी वेधशाळेच्या निरीक्षाणांवरून या शोधावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सिग्नस एक्स हे सूर्याच्या आसपासच्या परिसरातील तारे-निर्मितीचे सर्वात मोठे क्षेत्र आहे, ज्यामध्ये सर्वात तेजस्वीच नाही तर सर्वात जास्त वस्तुमानाचे काही तारेदेखील आहेत.

आतषबाजी दीर्घिका (एनजीसी ६९४६) या दीर्घिकेमध्ये इतर कुठल्याही दीर्घिकेपेक्षा जास्त अतिनवतारे पाहण्यात आले आहेत.

हंस तारकासमूहामध्ये सिग्नस ए ही जगातील शोध लागलेली सर्वात पहिली रेडिओ दीर्घिका आहे. पृथ्वीपासून ७३ कोटी प्रकाश-वर्षे अंतरावरील ही दीर्घिका सर्वात जवळील शक्तिशाली रेडिओ दीर्घिका आहे. दृश्य वर्णपटामध्ये ही एका लहान दीर्घिकांच्या समूहातील लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखी दिसते. ही एक सक्रिय दीर्घिका आहे कारण तिच्या केंद्रातील प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर द्रव्य ॲक्रिट करत असून त्यामुळे त्याच्या ध्रुवातून द्रव्याचे फवारे निघत आहेत. फवाऱ्याच्या आंतरदीर्घिकीय माध्यमाशी झालेल्या संपर्काने रेडिओ लोबची निर्मिती होते, जे रेडिओ उत्सर्जनाचे मुख्य स्रोत आहेत.[२७]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत