बृहदेश्वर मंदिर

बृहदेश्वर मंदिर

नाव:बृहदेश्वर मंदिर
निर्माता:राजराजा पहिला
देवता:भगवान शिव
वास्तुकला:द्रविड शैली
स्थान:तंजावूर, तमिळनाडू


बृहदेश्वर मंदिर (तमिळ - पेरुवुदैयार कोविल பெருவுடையார் கோயில்) तथा तंजई पेरिया कोविल हे तंजावर, तमिळनाडू मध्ये कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित भगवान शिवाला समर्पित द्रविड शैलीतील हिंदू मंदिर आहे.[१] मंदिरास राजराजेश्वरम देखील म्हटले जाते. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. विकसित तमिळ वास्तुकलेचे हे अनुकरणीय उदाहरण आहे, मंदिरास दक्षिणेचा मेरू असेही म्हणतात. हे मंदिर चोळ राजा राजराजा पहिला याने इ.स. १००३ ते १०१० या दरम्यान बांधले. या मंदिरासोबतच चोळ वंशाच्या काळातील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे युनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे ज्याला "चोळ राजांची जिवंत भव्य मंदिरे (ग्रेट लिव्हिंग चोला टेंपल्स)" म्हणून ओळखले जाते.[२]

नामकरण

राजराजा चोळ, ज्याने हे मंदिर बांधले, त्याने मंदिरास राजराजेश्वरम असे म्हटले, शब्दशः "राजराजाचे सर्वशक्तिमान मंदिर".[३] मंदिरातील नंतरच्या शिलालेखात मंदिराच्या देवतेला पेरिया उदैया नायनार असे संबोधले आहे, जे बृहदेश्वर आणि पेरुवुदैयार कोविल या आधुनिक नावांचे उगमस्थान असल्याचे म्हटले जाते.[४] बृहदेश्वर हा शब्द बृहत (अर्थ "मोठा, महान, उदात्त, विशाल"[५]) आणि ईश्वर या दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे.

स्थान

बृहदेश्वर मंदिर[६] हे चेन्नईच्या नैऋत्येस सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर तंजावर शहरात आहे. तंजावर हे शहर भारतीय रेल्वे, तामिळनाडू बस सेवा आणि राष्ट्रीय महामार्ग ६७, २४, १३४ द्वारे मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.[७][८] नियमित सेवा असलेले सर्वात जवळचे विमानतळ तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: TRZ), सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर आहे.[९]

इतिहास

राजराजा पहिला आणि त्याचे गुरू यांचे भित्तिचित्र.

बृहदेश्वर मंदिर चोळ राजा राजराजा पहिला याने इ.स. १००३ ते १०१० या दरम्यान बांधले. चोळ घराणे हे महादेवाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली होती. सध्याचे मुख्य मंदिर व गोपुरम हे ११व्या शतकाच्या सुरुवातीचेच आहे, मंदिरामध्ये मागील १००० वर्षांमध्ये अनेकवेळा नूतनीकरण आणि दुरुस्ती देखील झाली व नवीन मंदिरे देखील जोडली गेली. मुस्लिमहिंदु राज्यकर्त्यांमधील युद्धे व मंदिरावरील छाप्यांमुळे विशेषतः मदुराईचे मुस्लिम सुलतान यांच्यामुळे मंदिराचे नुकसान ही झाले व वेळोवेळी हिंदू राजघराण्यांनी मंदिराची दुरुस्ती देखील केली. मंदिरातील कार्तिकेय (मुरुगन), पार्वती (अम्मान) आणि नंदीची महत्त्वाची तीर्थे १६व्या आणि १७व्या शतकातील नायकांच्या काळातील आहेत. त्याचप्रमाणे दक्षिणामूर्ती मंदिर नंतर बांधण्यात आले.[१०] तंजावरच्या मराठा राज्यांनीही मंदिराची डागडुज केलेली व काही नवी बांधकामे देखील केलेली असा शिलालेख मंदिर परिसरात आढळतो.[११] १९८७ साली या मंदिरासोबतच चोळ वंशाच्या काळातील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे युनेस्को जागतिक वारसा यादीत सामाविष्ट करण्यात आली.[१२] कोणत्याही पायाशिवाय उभे असलेले हे मंदिर २००४ च्या त्सुनामीमध्येही सुरक्षित राहिले.[१] २०१० साली या मंदिराला १ हजार वर्षे पूर्ण झाली.

वर्णन

१००० वर्षांपूर्वी लिहिलेले तमिळ शिलालेख

कावेरी नदीच्या तीरावर बांधलेले भगवान शिवाला समर्पित बृहदेश्वर मंदिर हे कोणत्याही पायाशिवाय उभे आहे.[१३] ग्रॅनाइट दगडांचा वापर करून बांधण्यात आलेल्या मंदिरात १३ मजले आहेत, त्याची उंची सुमारे ६६ मीटर आहे. या मंदिराचे बांधकाम अशा प्रकारे केले गेले आहे की या मंदिरात उपस्थित कोणत्याही स्तंभ दगडांनी चिकटविला गेला नाही. केवळ दगडांना आकार देउन ते एकमेकांवर स्थिर केले गेले आहेत. त्यामुळे या मंदिरास तरंगणारे मंदिर देखील म्हटले जाते. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कलश आहे परंतु तो कलश ज्या दगडावर आहे, तो दगड जवळपास ८० टन इतका वजनी आहे. एवढ्या वजनाचा दगड त्याकाळी मंदिराच्या शिखरावर कसा नेला हे इतिहासकारांसाठी एक गूढच आहे. हे अप्रतिम मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की या मंदिराच्या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही. मात्र, मंदिराची उर्वरित सावली जमिनीवर पडते. मंदिरामध्ये तमिळसंस्कृत भाषेतील अनेक शिलालेख आहेत.[१][२] मंदिरामध्ये १६ फूट लांब, ८.५ फूट रुंद आणि १३ फूट उंच नंदीची मुर्ती आहे, ही भारतातील नंदीची दुसरी सर्वात मोठी मुर्ती आहे. एकाच दगडापासून बनवलेल्या ह्या मुर्तीचे वजन जवळपास २० हजार किलो इतके आहे.[१४]

११व्या शतकातील या मंदिराची मूळ स्मारके खंदकाभोवती बांधण्यात आली होती. त्यात गोपुरम्, मुख्य मंदिर, त्याचा भव्य बुरुज, शिलालेख, भित्तिचित्रे आणि शिल्पे प्रामुख्याने शैव पंथाशी संबंधित आहेत, परंतु हिंदू धर्मातील वैष्णव आणि शक्ती परंपरांचा देखील समावेश आहे. मंदिराचे इतिहासात नुकसान झाले होते त्यामुळे काही कलाकृती आता गायब आहेत. त्यानंतरच्या काळात मंदिरामध्ये अतिरिक्त मंडप आणि स्मारके जोडली गेली. हे मंदिर सध्या १६व्या शतकानंतर बांधण्यात आलेल्या तटबंदीच्या मध्यभागी उभे आहे.

ग्रॅनाइट वापरून बांधलेले मंदिराचे शिखर (विमान) हे दक्षिण भारतामध्ये सर्वात उंच आहे. मंदिरातील १३ फूट उंचीचा शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे आणि मंदिरामध्ये सुंदर शिल्पकला असलेल्या स्तंभांचे भव्य असे प्रांगण आहे. मंदिर त्याच्या उत्कृष्ट शिल्पकलेसाठी आणि ११व्या शतकातील पितळंच्या नटराजाच्या मुर्तीसाठी देखील प्रसिद्ध आहे. मंदिराच्या संकुलात नंदी, पार्वती, कार्तिकेय, गणेश, चंडेश्वर, वाराही, तिरुवरूरचे थियागराजर व इतर देवांचीही मंदिरे आहेत. हे मंदिर तामिळनाडूमधील सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे.[१५] मंदिरामध्ये महाशिवरात्रीसह इतर हिंदू सण देखील साजरे केले जातात.

सहस्र स्मरणोत्सव

सप्टेंबर २०१० मध्ये मंदिराला १००० वर्षे पूर्ण झाली. भव्य संरचनेचे १००० वे वर्ष साजरे करण्यासाठी, राज्य सरकार आणि शहराने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या प्रसंगी, राज्य सरकारने प्रख्यात नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली भरतनाट्यम यज्ञ, शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. २६ सप्टेंबर २०१० पासून हे छोटे शहर दोन दिवसांसाठी सांस्कृतिक केंद्र बनले कारण संपूर्ण शहरात विविध कलांचे व सांस्कृतिक नृत्याचे सादरीकरण केले जात होते.[१६][१७]

मंदिराचा सहस्राब्दी उत्सवाच्या पाचवा दिवशी, २६ सप्टेंबर २०१० रोजी, देशाच्या सांस्कृतिक, स्थापत्य, ऐतिहासिक इतिहासातील बृहदेश्वर मंदिराच्या योगदानाची ओळख म्हणून, भारतीय टपालाने मंदिराच्या गोपुरमचे चित्र असलेले ₹ ५ चे टपाल तिकीट प्रसिद्ध केले.[१८] भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मंदिराचे नक्षीकाम केलेले ₹ ५ चे नाणे जारी करून या घटनेचे स्मरण केले.[१९] भारत सरकारच्या मुंबई मिंटने ५ रुपयांच्या नाण्याप्रमाणेच मंदिराचे चित्र असलेले १००० रुपयांचे गैर-परिचालित (नॉन सर्क्युलेटिव्ह) स्मरणार्थी नाणे जारी केले. स्वतंत्र भारतामध्ये प्रसिद्ध होणारे हे पहिले १००० रुपयांचे नाणे होते.[२०]

१ एप्रिल १९५४ रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹ १००० ची चलनी नोट जारी केली होती ज्यामध्ये बृहदीश्वर मंदिराचा सांस्कृतिक वारसा आणि महत्त्व दर्शविणारे विहंगम दृश्य आहे. परंतु १९७५ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नात सर्व ₹ १००० च्या चलनी नोटा चलनातून रद्द केल्या. या नोटा आता संग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.[२१]

सहस्राब्दी वर्षानिमित्त तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री, एम करुणानिधी यांनी उच्च उत्पादकता असलेल्या सेम्माई तांदूळाचे राज राजन-१००० असे नामकरण केले.[२२][२३]

प्रशासन

जागतिक वारसा स्मारक म्हणून, मंदिर आणि परिसर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत येतो जो भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, मंदिराची सुरक्षा, जतन आणि डागडुजीचा जबाबदारीही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची आहे.[२४]

सध्या मंदिराच्या प्रशासनाची व व्यवस्थापनाची जबाबदारी तंजावर मराठा राजघराण्याचे प्रमुख बाबाजी भोंसले यांच्याकडे आहे. ते देवस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त आहेत, या विश्वस्त मंडळाद्वारे बृहदेश्‍वर मंदिरासह ८८ चोळ मंदिरांचे व्यवस्थापन केले जाते. बाबाजी भोंसले हे चोळ घराण्यातील किंवा तमिळ वंशाचे नसल्यामुळे त्यांचे हे अधिकार रद्द करण्यासाठी तमिळ गटाने तमिळनाडू सरकारकडे याचिका केली आहे. आंदोलकांपैकी काहींच्या मते, बाबाजी भोंसले हे तंजावरच्या मराठा राजांचे कायदेशीर वारस देखील नाहीत असेही म्हटले जाते.[२५]

चित्रदालन

मंदिरात अनेक शिल्पे, आराम आणि भित्तीचित्रे आहेत:[२६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत