ना.धों. महानोर

मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार

नामदेव धोंडो महानोर (ना.धों. महानोर नावाने प्रसिद्ध; १६ सप्टेंबर १९४२ - ३ ऑगस्ट २०२३) हे एक मराठी कवी आणि गीतकार होते.[२] १९७८ तसेच १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात.[३] मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते.[४]

ना.धों. महानोर
जन्म नावनामदेव धोंडो महानोर
टोपणनावरानकवी
जन्म१६ सप्टेंबर १९४२
पळसखेड, [जळगाव जिल्हा]
मृत्यू३ ऑगस्ट, २०२३ (वय ८०)[१]
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
कार्यक्षेत्रमराठी कविता, गीत
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता
विषयनिसर्ग कविता
वडीलधोंडो महानोर
पुरस्कारपद्मश्री

१९९१ भारत सरकारने पद्मश्री हा देशातला चौथा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[२]

जीवन

ना.धों. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी ब्रिटिश भारतातील औरंगाबादच्या पळसखेड गावी झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण पळसखेडला घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णी गावच्या शाळेते गेले. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.[५] परंतु आर्थिक समस्यांमुळे एका वर्षात त्यांनी शिक्षण सोडले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.[६]

कारकीर्द

साहित्य

रानातल्या कविता (१९६७) हा महानोरांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२) असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी ही त्यांची कादंबरी १९७२ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गपसप (१९७२) आणि गावातल्या गोष्टी (१९८१) हे लोककथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी लोकगीतांचे एक संकलनही (पळसखेडची गाणी, १९८२) प्रसिद्ध केले आहे.[५] महानोरांनी गद्यलेखन देखील केलेले असले तरी प्रामुख्याने ते निसर्गावरच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत.


"या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो... आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..."

"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे... आणि या मातीतूनी चैतन्य गावे... कोणती पुण्ये येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे..."

चित्रपटसृष्टी

अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांची गाणी खूप गाजली आणि आजही प्रसिद्ध आहेत. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांतील त्यांची गाणी आजही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात.[७]

१)मी रात टाकली, २)जांभूळ पिकल्या झाडाखाली, ३)लिंबोणीचं लिंबू, ४)चिंब पावसानं रान झालं आबादानी, ५)दूरच्या रानात केळीच्या बनात, ६)आम्ही ठाकरं ठाकरं७)बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं ८)राजसा जवळी जरा बसा इत्यादी अजरामर गीते त्यांनी लिहली.

राजकीय कारकीर्द

महाराष्ट्र सरकारने १९७८ मध्ये साहित्यिक−कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली.[२][३] साहित्यिक प्रश्नांबरोबरच त्यांनी शेती क्षेत्रातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले. त्यांनी जलसंधारण पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव सभागृहात मांडले, जे पारित देखील झाले. १९७८-८४ या काळाबरोबरच १९९०-९५ मध्ये देखील ते विधान परिषदेवर होते.[८]

साहित्य आणि कार्यक्रम

प्रकाशित साहित्य [ संदर्भ हवा ]

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंठा (कवितासंग्रह)दीर्घ कवितापॉप्युलर प्रकाशन१९८४
कापूस खोडवा)शेतीविषयक
गंगा वाहू दे निर्मळकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
गपसपकथासंग्रहसमकालीन प्रकाशन
गावातल्या गोष्टीकथासंग्रहसमकालीन प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावेकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोकासाकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळकविता संग्रहसाकेत प्रकाशन
पळसखेडची गाणीलोकगीतेपॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवेपॉप्युलर प्रकाशन
पानझडपॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविताकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
पु. ल. देशपांडे आणि मी]]समकालीन प्रकाशन
यशवंतराव चव्हाणसाकेत प्रकाशन
यशवंतराव चव्हाण आणि मीव्यक्तिचित्रणपरसमकालीन प्रकाशन
या शेताने लळा लाविलासमकालीन प्रकाशन
रानातल्या कविताकविता संग्रहपॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मीसाकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवनशेतीविषयकसाकेत प्रकाशन

ना धों महानोर हे गीतकार असलेले चित्रपट [ संदर्भ हवा ]

चित्रपटवर्ष (इ.स.)
अबोलीइ.स.१९९५
एक होता विदूषकइ.स.१९९२
जैत रे जैतइ.स.१९७७
दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम)इ.स.२०१४?
दोघीइ.स.१९९५
मुक्ताइ.स.१९९४
सर्जा इ.स.१९८७
मालकइ.स. २०१५
ऊरुसइ.स. २००८
अजिंठाइ.स. २०११
यशवंतराव चव्हाणइ.स. २०१२

महानोर यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम [ संदर्भ हवा ]

  • झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या. त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
  • डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
  • संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या 'दूरच्या रानात केळीच्या बनात' या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली होती.
  • ना. धो. महानोरांची काव्यसृष्टी (सोमनाथ दडस)
  • ना. धों. महानोरांची प्रतिमासृष्टी आणि संपादने (सोमनाथ दडस)


पुरस्कार आणि सन्मान

  • भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१[२]
  • जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे २०१५
  • कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) इ.स. १९८५
  • 'वनश्री' पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. इ.स १९९१
  • 'कृषिरत्न' शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक इ.स. २००४
  • डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार इ.स. २००४
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
  • साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (२०१२)
  • 'मराठवाडा भूषण'
  • महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
  • अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.
  • जळगाव येथील भॅंवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना.धों. महानोर पुरस्कार देते.
  • इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून सु.ल. गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार ठेवले आहेत. ना.धों. महानोर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
  • औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • २२ फेब्रुवारी २०१२ - पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • २४ मार्च २०१४ - दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
  • १ले जलसाहित्य संमेलन नागपूरचे संमेलनाध्यक्षपद.
  • १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद.
  • यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईचा ३ रा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०१५

हेदेखील पाहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत