दुर्गापूजा

प्रमुख हिंदू धार्मिक उत्सव आणि व्रत
(दुर्गा पूजा या पानावरून पुनर्निर्देशित)

दुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे.[१] या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते.[२] हा नवरात्री व्रताचा भाग आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत.[३] बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश या प्रांतांत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बंगाल प्रांतात त्याचा प्रचार आणि त्याची लोकप्रियता विशेष आहे.[४] बंगालमधील ग्रामीण भागात ही पूजा वसंत ऋतूमधेही केली जाते अशी नोंद मिळते.[५]

दुर्गापूजा (२०२३)

इतिहास

दुर्गापूजेची परंपरा सुमारे ४०० वर्ष जुनी आहे असे मानले जाते. बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली. बंगालमधून ही प्रथा बनारसला (सद्य - वाराणसी) व आसामलाही पोहोचली. ह्याच्यानंतर इ.स.१९११ पासून दिल्लीत ही पूजा सुरू झाली. स्वातंत्र्यलढ्यात या पूजांची केंद्रे ही राजकीय आणि सामाजिक चर्चांची महत्त्वाची ठिकाणे बनली होती.[६]

दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे.[७] सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे.[८]

व्रताचा विधी

दुर्गापूजा सायंकालीन आरती

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. बंगालमध्ये नवरात्रातल्या शेवटच्या सहा दिवशी (षष्ठी ते दसरा) दुर्गापूजा केली जाते.[९] महापंचमी, महाषष्ठी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी हे दिवस दुर्गापूजनात महत्वाचे मानले जातात.[१०]

पूजेचा विधी खालीलप्रमाणे आहे-

गृहस्थ सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्निक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात. मग गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात. मग षोडशोपचारे पूजा करतात. दुर्गेजवळ अखंड दीप तेवत ठेवतात. नंतर दुर्गास्तोत्राचा पाठ करतात. दुर्गेवर फुलांची माळ बांधतात. नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात, ब्राह्मण भोजनही घालतात.

बंगालमधील अनेक लोक दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे.[८][११] अशा प्रकारे दुर्गापूजा घरगुती पातळीवर साजरी केली जाते.

सार्वजनिक दुर्गापूजा

पुण्यातील दुर्गापूजा २०२२

सुमारे एक हजार वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुज मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मीसरस्वती यांच्या मूर्ती असतात.[१२] देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते.[५] दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते. त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता वल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते. उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात. मग तिला पशुबळी देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायन, वादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात. चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत व तळ्यात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसात सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात.[८]

बंगाल प्रांतात या उत्सवासाठी कारागीर विशेष प्रकारच्या देवीच्या उत्सवमूर्ती तयार करतात. यामध्ये महिषासुरमर्दिनीसह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांच्या मूर्तीही तयार केल्या जातात.[१३] धुनुचि नृत्य हे या उत्सवाचे महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.[१४]

राजकीय महत्त्व

दुर्गापूजेच्या काळातच बंकिमचन्द्र चॅटर्जी यांना "वंदे मातरम" हे गीत स्फुरले आणि नंतर ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले असे मानले जाते.[१५]

सार्वजनिक पातळीवर दुर्गापूजेची सुरुवात बंगालमधील कोलकत्ता शहरामध्ये इ.स. १७५७ साली सावोबाजारच्या राजा नबदेव याने केली. प्लासीच्या लढाईत लाॅर्ड क्लाईव्ह याने सिराजउद्दौला याच्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे साजरीकरण केले गेले होते. या पूजेसाठी राजाने लाॅर्ड क्लाईव्हला आमंत्रित केले. लाॅर्ड क्लाईव्ह देवीच्या पूजेसाठी एक बकरे, एकशे एक रुपये रोख आणि फळांनी भरलेली टोपली घेऊन आला होता. ह्या पहिल्या सार्वजनिक साजरीकरणामध्ये फक्त तत्कालीन अमीर उमरावांना बोलावणे धाडले गेले होते, परंतु पुढे जाऊन दुर्गापूजेचे सार्वजनिक साजरीकरण सुरू झाले. आणि दुर्गापूजेचा मंडप, त्याची सजावट आणि त्या सजावटीचे स्वरूप या सर्वांना राजकीय रंगात रंगवण्यात आले. अगदी इंग्रजांपासून, साम्यवाद्यांसारख्या राजकीय पक्षापासून ते अलीकडच्या एड्सवर काम करणाऱ्या संस्थां, संघटनांपर्यंत अनेकांनी तसेच विविध चळवळींनी ह्या साजरीकरणाचा उपयोग करून घेतला आहे.[१६][१७]

Dhunuchi dance at Samajsevi Sangh V 20181017 112000

दुर्गापूजा उत्सवातील हा महत्वाचा नृत्य सेवा प्रकार आहे.

चित्रदालन

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत