चैत्रगौरी

महाराष्ट्रातील पूजा आणि व्रत

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते.[१] देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीये)पर्यंत तिची पूजा केली जाते.शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय.[२]

झोपाळ्यावर बसवलेली चैत्रगौर

चैत्रगौरी सोहळ्याचे स्वरुप

पाळण्यातील गौर आणि सजावट

चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात,[३] व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात. कोकणात घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुऊन त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात.भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ देतात. गौरीची आरती करताना 'गौरीचे माहेर'नावाचे एक गाणे म्हणतात.ही पद्धती कोकणात दिसून येते.घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही काही ठिकाणी दिसून येते.या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे.[४]

नैवेद्य

कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज,कलिंगड यासारखी फळे ,भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.[५]

चैत्रांगण

या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते.[६]

देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.[७]

चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात.यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे  अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांगणात काढली जातात.[८]

भारतात अन्यत्र

कर्नाटक—चैत्रगौरी ही कर्नाटकातही मांडली जाते.[९] तिचे पूजन करून सुशोभन केले जाते.स्रियांची भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरतात.

राजस्थान—राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरू होतो.या दिवशी गणगौर बसवितात.होळीच्या राखेचे आणि शेणाचे १६ मुटके करतात.भिंतीवर १६ हळद आणि कुंकवाच्या टिकल्या काढतात.त्याखाली मुटके मांडतात.हे मुटके हे गौरीचे प्रतीक होय.गव्हाच्या ओंब्या,हळद यांनी पूजा करतात.ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्यांजवळ ते कणीस ठेवतात.त्याला शंकर म्हणतात.आणखी एका कणसाला केसांचा गुंता आणि लाल पिवळा धागा बांधतात.हेही गौरीचे प्रतीक मानले जाते.या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवतात.[१०]

भारतातील आदिवासी जमातींमधेही महिला चैत्रगौरीचे पूजन करतात.[११]

चित्रदालन

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत